Community elders carefully hearing messengers as neighbors surround and comfort a frightened child

1 योहान 4

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
विश्वासणाऱ्यांनी आध्यात्मिक दाव्यांची परीक्षा घ्यावी लागते कारण अनेक खोटे संदेष्टे निघून गेले आहेत, देहधारी ख्रिस्ताची कबुली महत्त्वाचे मोजमाप आहे. देव प्रेम आहे, पुत्र पाठवण्याद्वारे प्रकट झाला, आणि विश्वासणाऱ्यांमधील देवाचे प्रेम भीती दूर करणाऱ्या आत्मविश्वासात परिपक्व होते.
विवेचनदेहधारणदेव प्रेम आहेभीतीपासून स्वातंत्र्य
1प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत.
2याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे.
3परंतु प्रत्येक आत्मा जो येशूंचा अंगीकार करीत नाही तो परमेश्वरापासून नाही. हा तर ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे, ज्याच्या येण्याबद्दल तुम्ही ऐकले आहे आणि तो आधीच जगामध्ये आलेला आहे.
4प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही विजय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा जे तुम्हामध्ये आहेत, ते श्रेष्ठ आहेत.
5हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते.
6आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. याद्वारेच आम्ही सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता हे ओळखतो.
7प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात.
8परंतु जे प्रीती करीत नाहीत, ते परमेश्वराला ओळखत नाहीत, कारण परमेश्वर प्रीती आहेत.
9परमेश्वराने आपल्यावरील प्रीती अशी प्रकट केलीः त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठविले यासाठी की, आपल्याला त्यांच्याद्वारे जीवन लाभावे.
10प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले.
11प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याअर्थी आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे.
12परमेश्वराला कोणीही कधीही पाहिले नाही; परंतु जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर, परमेश्वर आपल्यामध्ये राहतात आणि त्यांची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण झाली आहे.
13ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा हा आहेः त्यांनी स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे.
14आम्ही पाहिले आहे आणि अशी साक्ष देतो की, पित्याने त्यांच्या पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे.
15येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकृत करतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात आणि ते परमेश्वरामध्ये राहतात.
16परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात.
17अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला असा आत्मविश्वास प्राप्त व्हावाः या जगात आपण येशू सारखे आहोत.
18प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
19आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी प्रथम आम्हावर प्रीती केली.
20जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात, तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनही त्यांच्यावर प्रीती करीत नाही, तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाहीत, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही.
21परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली आहेः जे कोणी परमेश्वरावर प्रीती करतात त्यांनी आपल्या भावावर आणि बहिणीवर सुद्धा प्रीती करावी.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.